बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

शाळा गुल्ल; खाजगी शिकवण्या हाऊसफुल्ल

शहरात खाजगी क्लासचा वाढतोय व्याप ; सामान्यांना शिक्षण अवाक्या बाहेर


श्रीकांत बोरावके

आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे तो अधिक हुशार आणि गुणवंत व्हावा या करिता आपल्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावत मुलाला खाजगी क्लासला पाठविणाऱ्या पालकांमध्ये वाढ होत असून पिंपरी-चिंचवड शहरात सद्या  खाजगी क्लासेसचा गोरख धंदा मोठ्या जोमात सुरु आहे.पण अशा पालकांमुळे ज्यांना या आभासी आणि खर्चिक शिक्षण पद्धतीत पडायची इच्छा नसते अशा गरीब कुटुंबातील पालकानाही अशा प्रवाहात वाहावे लागत आहे.काही शाळांमध्ये तर मुल खाजगी क्लासला जातात म्हणून वर्गात सविस्तर शिकविले जात नसल्याच्या तक्रारी कानावर येत आहेत तर काही ठिकाणी शाळेतील शिक्षकांचेच खाजगी क्लासेसे असल्याने वर्गात काही प्रकरणे शिकवली जात नसल्याचे समोर आले आहे.यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी खाजगी क्लासेस लावले नाहीत त्यांच शैक्षणिक नुकसान होत असून या बाबत तक्रार ही करता येत नाही.याही पेक्षा गंभीर प्रकार शहरात सुरु असून कॉलेज करण्यापेक्षा केवळ खाजगी क्लास करणारे विद्यार्थी असून यामुळे शहरात महाविद्यालये गुल्ल आणि खाजगी क्लासेस झाले फुल्ल अशी परस्थिती दिसून येत आहे.
         
खाजगी क्लासेसचा असा धंदा शहरात तेजीत असून त्याची फी महाविद्यालयांच्या शैक्षणिक फी  पेक्षाही अधिक आहे.त्यातच अनेक क्लासवाले गुरुजी करोड पती झाल्याचे बोलले जात आहे.यात खाजगी क्लास पेक्षा पालकांची मानसिकता सुधारण्याची गरज असून आपला मुलगा खाजगी क्लासला गेला म्हणजे अधिक हुशार किवा चांगल्या गुणांनी पास होणार हा समज दूर करण्याची गरज आहे.या क्लासेसमुळेच शाळा-महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेची बोंंब झाल्याचे दिसते. त्यात हे क्लासेसवाले तरी कोण ? त्याच महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक असतात.दुकानदारी चालत नाही म्हणुन हमाली करण्याचा जणु काही ठेकाच धरला आहे की काय? असा प्रश्न प्रत्येकालाच पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र तरीसुद्धा या शिकवणींमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणुन प्रत्येकजन प्रयत्न करतांना दिसतात.शिकवणारांचा आवाज विद्याथ्र्यांपर्यंत चांगला पोहचावा म्हणुन प्रत्येक शिकवणीच्या खोलीमध्ये मोठ-मोठ्या आवाजाचे यंत्र बसवण्यात येत आहेत.
खाजगी क्लासेस म्हणजे जणू बिन मान्यतेच्या शाळाच बनत आहेत.
             खाजगी क्लासेसला सरकारी मान्यता नाही त्यात या मध्ये शिकविणारे शिक्षकही दर्जात्मक असतील याची खात्री नाही तरी आपल्या मुलाला अमुक क्लास मध्ये प्रवेश मध्ये प्रवेश मिळावा याकरिता आग्रही असलेल्या पालकांची संख्या ही वाढती आहे.त्या पेक्षा शासनाच्या अनुदानित शाळांमध्ये शासनाचा पगार घेऊन शिकविणारे शिक्षण दर्जात्मक नसतील का ? याचा पालक तुसभर ही विचार करत नाही.थोडक्यात खाजगी क्लासेसची  शिकवणी ही ज्याच्या त्याची अंतर्गत बाजू असली तरी यांमुळे सामाजिक समतोल ढासळला जात असून ही चिंतेची बाब ठरत आहे.यांमुळे ज्यांची परस्थिती आपल्या किमान शिक्षण देण्याची नाही अशा गरीब पालकांनाही इतरांच्या बरोबरीने आपल्या मुलांनी चालावे या करिता खाजगी क्लासचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या क्लासेसचा त्रास केवळ दहावी - बारावीतील विद्यार्थ्यानांच सहन करावा लागत नसून पहिली ते पदवी पर्यंतच्या साऱ्यांच्याच पाठीवर हा बागुलबुवा आहे.यामुळे शाळा ही विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीवर म्हणावे तसे लक्ष देत नसून ते ही हे काम खाजगीवाल्यांकडे सोपवून वर्षभर निर्धास्त असतात.यामुळे च शहरात सद्या तेरी भी चूप मेरी चूप असे प्रकार आहेत. महापालिकेच्या १३६ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा असून २०८ खाजगी शाळांचा समावेश आहे.याबरोबरच पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये व अभियांत्रिकी विद्यालये मोठ्या संख्येने शहरात आहेत.या नोदणी कृत आणि अधिकृत असल्याने यांचा निश्चित असा आकडा सांगता येतो.यालट खाजगी क्लासेसची  अधिकृत नोंद नसून त्यांचा अंदाजे आकडा हजारोंच्या घरात आहे.

शासन कायदा करण्याच्या तयारीत …
याबाबत काही प्रमाणात निर्बध यावेत या करिता शासन पातळीवर कायदा करणार असल्याची घोषणा नुकतीच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पावसाळी अधिवेशनात विधीमंडळात केली.आहे तरीही यातूनही पळवाट काढत हा गोरख धंदा सुरूच राहिली असे मत एका जेष्ठ शिक्षकाने व्यक्त केले.


आम्ही स्वत: घरापर्यंत जात नाही…

आम्ही आमचे खाजगी क्लास काढले असले तरी त्या करिता आम्ही आमच्या कडेच प्रवेश घ्या यासाठी आग्रही नसतो किवा त्या करिता घरा पर्यंत ही जात नाही पालक स्वत:च आमच्या पर्यंत येत असतात.खाजगी क्लास लावावा कि न लावावा हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न आला.असे मत एका खाजगी क्लास चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले

चिंतेची बाब
खाजगी क्लासेसमुळे विद्यार्थी आणि शाळांचा शैक्षणिक दर्जा ढासळत असून ही चिंतेची बाब आहे.ज्यांनी परस्थिती चांगली ते क्लास लावू शकतात परंतु ज्यांना दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न आहे.त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेची जबाबदारी कोणाची.यामुळे खाजगी क्लासेस बंद झाल्यावर सहाजिकच शाळांच्या गुणवत्तेच्या जाबादाऱ्या  वाढतील आणि सारे एका समान प्रवाहात येतील.
          :-  सौदामिनी कांबळे,समाजिक कार्यकर्त्या

( पूर्व प्रसिद्धी पुढारी ०२-०८-२०१५ )


 

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

तरुणाईला व्हाइटनरची झिंग

शाळकरी मुलांमध्ये प्रमाण अधिक ; पालक अज्ञभिज्ञ 

श्रीकांत बोरावके : मोशी

      
     
                 कागदावरील एखादी चूक झाकण्यासाठी वापरले जाणारे व्हाइटनरच आज चुका करण्याचे साधन बनत असून किरकोळ वाटणारे व्हाइटनर आज नशा करण्याचे साधन बनत आहे.या नव्या अमली पदार्थ ठरू पाहणाऱ्या व्हाइटनरने नशा करू पाहणाऱ्या  मुलांचे प्रमाण गेल्या चार पाच वर्षांपासून वाढत आहे. तेरा वर्षांपर्यंतची मुले या सेवनाला जास्त बळी पडत असल्याचे समोर आले असून याबाबत मुलाबरोबरच पालकही अज्ञभिज्ञअसल्याचे दिसून येते.केवळ काहीतरी वेगळे जाणवते म्हणून दररोज व्हाइटनरचा वास घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपण कुठल्याश्या व्यसनाच्या आहारी जात आहोत हे जाणवत नाही तर आपला मुलगा असले काही करत असले याची पालकांना ही जाणीव नाही.
रस्त्यावरील,झोपडपट्टीतील,रेल्वेस्टेशन वरील मुलांपूर्ती व्हाइटनरची नशा सीमित राहिली नसून पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यमवर्गीयांपासून ते उच्चभ्रू कुटुंबातील मुलांमध्येही हा प्रकार सुरु आहे.शाळेत वा शाळेबाहेर ,स्कूलबस मध्ये पालक नसताना घरात किंवा सोसायटी,वस्ती मध्ये आज चोरी छुपे मुले व्हाइटनरची नशा करताना दिसून येतात.मध्यंतरी व्हाइटनरच्या विक्री वर प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध घातले होते.यामध्ये प्रामुख्याने विक्री करताना ग्राहकाची मागणी,ग्राहकाचे वय,एकाच ग्राहकाची वारंवार त्याच गोष्टीची मागणी होऊ लागल्यास त्या ग्राहकास विक्री न करने अशा निर्बंधांचा समावेश होता.परंतु केवळ व्यवसाय वृद्धीसाठी अशा निर्बंधांचा विचार न करता सरासपणे मागणी तसा व्हाइटनरचा पूरवठा होताना दिसून येतो.यामुळेच या व्यसनाला पायबंद घालणे अशक्य होताना दिसून येते.कमी किंमतीत आणि सहज उपलब्ध होत असल्याने काही इतर साधनातून व्यसन करणारी मंडळी ही व्हाइटनरच्या व्यसनाकडे वळतात.प्रामुख्याने व्हाइट स्टेशनरीच्या दुकानात मिळत असल्याने आणि स्टेशनरीची दुकाने शाळा,महाविद्यालय परिसरात असल्याने या मंडळीची अशा ठिकाणी वर्दळ असते त्यात अशा लोकांच्या संपर्कात एकदा शाळकरी मुलगा आल्यास त्यालाही यात गुंतण्यात वेळ लागत नाही आणि अशा प्रकारे एका कडून दुसऱ्याला दुसऱ्या कडून तिसऱ्याला व्यसनाची माहिती प्रसारित होते.आणि यातूनच व्यसन वाढते.शहरातील भोसरी,पिंपरी,मोशी,आळंदी रस्ता,दिघी,चिखली,कुदळवाडी,आकुर्डी,निगडी,मोहन नगर,इंद्रायणी नगर,चिंचवड आदी भागातील शाळा,महाविद्यालय परिसरात हे प्रकार घडत आहेत.


असे होते व्हाइटनरची नशा….

व्हाइटनर रुमालावर टाकून हुंगल्याने त्याची नशा चढते. व्हाइटनरमध्ये अॅसिटोन असल्याने त्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो. यामुळे कमालीची नशा चढते आणि बधिरताही येते. अॅसिटोन हळूहळू स्नायूंवर परिणाम करून, ते दुबळे करतात. मानसिकदृष्ट्या मुले खच्ची होऊ लागतात आणि काही वेळेस मुलांमध्ये आक्रमकताही तेजीने वाढते, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात..


               आपला मुलगा व्हाइटनरच्या सेवनाला बळी पडतो आहे हे पालकांच्या सहज लक्षात येत नाही. रस्त्यावर, रेल्वेस्टेशनवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांचे प्रमाण या सेवनामध्ये जास्त दिसून येते. व्हाइटनर कमी किमतीत आणि सगळीकडे सहज उपलब्ध असल्याने मुले त्याचा वापर करू शकतात. या अमली पदार्थासंदर्भात पालकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये फारशी माहितीही नाही. त्यामुळे मुलाने त्याची मागणी केली अथवा दुकानातून जाऊन आणले तर, शालेय कामासाठी त्याचा वापर करत असेल या विचाराने पालकांचे या वृत्तीकडे दुर्लक्ष होते.
                                                     
( पूर्व प्रसिद्धी,पुढारी २० जुलै २०१५ )