शनिवार, २० जून, २०१५

शहरातून '' पाणपोई '' संस्कृतीच होतीये हद्दपार

भरउन्हात पाण्यासाठी पादचाऱ्यांची वणवण ; स्वयंसेवी संस्थाही संवेदनाहीन

श्रीकांत बोरावके
 
                    कडाक्याचा उन्हाळा,डोक्यावर रणरणत ऊन असतांना भर दुपारी शहरातील रस्त्यावर फिरलात तर घोटभर पाणी हि विकत घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते कारण शहरातून पाणपोईच गायब झाली आहे.पूर्वी प्रमाणे स्वयंसेवी संस्थाही पाणपोई उभारतांना दिसत नाही.
                         उन्हाळा आला म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आजकाल साद घालताना दिसत आहेत. सरकारी यंत्रणाही यासाठी सरसावल्या आहेत. परंतु, माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी असणारी आवश्यक सोय मात्र कमी झालेली दिसते आहे.
                          पाणी पाजणे हे पुण्याचे कार्य म्हणून अनेक व्यक्ती व  स्वयंसेवी संस्था पूर्वी अशा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय करायच्या. परंतु, आजकाल या संस्था याबाबतीत उदासिन दिसून येत आहेत.त्यांच्या या उदासीनतेचा लाभ मिनरल वॉटर विकनारयांना होत असून आता रस्तोरस्ती त्यांनी दुकाने थाटलेली दिसत आहे.यासाठी तहानलेल्या जीवांना आता घशाची कोरड भागविण्यास पंधरा ते वीस रुपये मोजावे लागत आहे.उद्योग नगरीत काम करणाऱ्या कष्टकरयाला तहान भागविण्यासाठी विकतचे पाणी घेणे कितपत परवडणारे आहे.?हा प्रश्न उपस्थित होतो.शहरात फेरफटका मारला की, फार तुरळक प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या सोई दिसून येतात.
                           ''पाणी हेच जीवन'' ,''पाण्याचे काम पुण्याचे काम'' असे जरी म्हटले जात असले तरी आज पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाईने उद्योग नगरीतील सामान्य,कष्टकरी नागरिक हवालदिल होत आहेत. पिण्याचा पाण्यासाठी नागरिकांची भटंकती होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यावर पाणपोई लावल्याचे चित्र आधी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. मात्र, आता याची संख्या कमी झाली आहे का ? कि वाटसरूस पाणी पाजण्याची आपली संस्कृतीच नामशेष होत आहे ? असा प्रश्न  निर्माण झाला आहे. स्वयंसेवी संस्था,तरुण मंडळे तसेच पालिकेने यासाठी पुढाकार घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशीही मागणी होताना दिसून येत आहे.



पक्षांना पाणी ; माणसाचे काय  
आज रस्त्यावर फिरत असतांना एकाही ठिकाणी पाणपोई दिसत नाही.आजची तरुण पिढी पक्षांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेताना दिसते.परंतु भर उन्हात रस्त्याने चालेल्या वाटसरूबाबत त्यांच्या संवेदना का जाग्या होत नाही.
:-  तुकाराम कांबळे,जेष्ठ नागरिक





 ( पूर्व प्रसिद्धी पुढारी - पिंपरी ०८मे २०१५ )

बुधवार, १७ जून, २०१५

भाडेकरुंची माहिती देण्याकडे दुर्लक्ष


जागृकतेचा अभाव : निम्यापेक्षा अधिक लोकांच्या नोंदीच नाही.

श्रीकांत बोरावके
          पिंपरी - चिंचवड  शहरात बाहेरगावावरुन नोकरी तसेच शिक्षणासाठी अनेक जण राहण्यासाठी येत असतात. त्यामुळे घर भाड्याने देण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात शहरात व उपनगरात आहे. घरमालकाने घर भाड्याने देताना भाडेकरूची नोंद पोलिस स्टेशनला द्यावी असे आदेश मध्यंतरी पोलीस अधिक्षकांनी दिले होते.त्यांनंतर भाडेकरुची माहीती न देणा-या काही घरमालकावर गुन्हेही दाखल करण्यात आले.मात्र माहीती देणे बंधनकारक असतानाही घरमालकांचे या नोंदणीकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शहर व मोशी,डूडूळगाव या उपनगरांमध्ये रहायला येणा-या नागरीकांची संख्याही वाढत आहे.अनेक जण परराज्यातुन शहरात व्यापार व व्यावसायसाठी येत आहेत. शहरात आल्यानंतर भाड्याने घर घेऊन राहणा-यांचे प्रमाण यामुळेच वाढलेले आहे. त्यामुळे अनेक जण घर भाड्याने घेवुन रहात आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी व सुरक्षेच्या दृष्टिने मध्यंतरी पोलीस अधिक्षकांनी घर भाड्याने दिलेल्या व्यक्तीची संपुर्ण माहीती शहर पोलीस ठाण्याला दयावी असे आदेश काढले होते. त्यामुळे घर भाड्याने दिलेल्या प्रत्येक घरमालकाला आपल्या भाडेकरुची माहीती देणे बंधनकारक झाले आहे.या बाबत नोंद करणे अतिशय सुलभ व्हावे या साठी संकेतस्थळाचा पर्यायही पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिला असला तरीही त्या बाबत स्थानिकांमध्ये निरक्षरता असल्याचे दिसून येते.परिणामी तो हि पर्याय निरर्थक ठरत असून भाडेकरुंच्या नोंदीच या परिसरात अपेक्षेप्रमाणे होताना दिसून येत नाहीत.मोशीत स्थानिक नागरिकांच्या हजारो खोल्या भाड्याने देण्यात आल्या आहेत. बोऱ्हाडे वाडी,बनकरवस्ती,शिवाजीवाडी,आल्हाट वस्ती,सस्तेवाडी,लक्ष्मी नगर, संजय गांधी नगर,देहू रस्ता आणि मोशी गावठाण या भागात मोठ्या प्रमाणावर भाडेतत्वावर खोल्या देण्यात आल्या आहेत. सतत बदलणाऱ्या भाडेकरुंमुळे घरमालकांमध्ये त्यांची माहिती घेण्याबाबत निष्काळजीपणा असल्याचे दिसून येते. पुणे,पिंपरी शहरात हि मोहीम प्रभावी पणे राबवली जात असताना मोशी,डूडूळगावकरांमध्ये मात्र याबाबत निरुत्साह दिसून येत आहे.याबाबत पोलिस चौकीशी संपर्क साधला असता संकेत स्थळाचा पर्याय उपलब्ध करण्यात आल्याने नोंदींचा निश्चित आकडा स्थानिक पोलिस स्टेशन कडे  उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती मदत पोलिस चौकीकडून केली जाईल असे आवाहन हि त्यांनी केले आहे.
अपेक्षे प्रमाणे नोंदी नाही…

पोलिस प्रशासनाकडून संकेत स्थळाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी याबाबत मोशी व परिसरातील नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसून.एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने झालेल्या नोंदी या कमी प्रमाणात असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पुढारीला दिली आहे.


( पूर्व प्रसिद्धी  लोकमत -ग्रामीण  २२-०४-२०१५ )

मंगळवार, १६ जून, २०१५

''रुपी'' प्रकरणात मोशीकरांच्या लाखोरुपयांच्या ठेवी गुंतून


भविष्याच्या दृष्टीने गुंतवलेले पैसेच भेटेना : व्याजाने पैसे घेऊन गुजरान 

श्रीकांत बोरावके : मोशी

                   आपल्या जमिनींची विक्री करून त्याच पैश्यांवर भविष्यात उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात रुपी बँकेमुळे आज केवळ अश्रूच उरली आहेत.पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत समावेश झाल्या नंतर मोशीत हळूहळू स्थीत्यांतरे होत गेली येथील जमिनीला सोन्याचा भाव येऊ लागला.काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी नवी स्वप्ने पाहिली या उद्योगनगरी मध्ये सामावण्याची त्या साठी हक्काची जमीन विकून भविष्याच्या दृष्ठीने हा पैसा वापरता यावा यासाठी काही वर्षांसाठी तो ठेव म्हणून रुपी बँकेत ठेवण्यात आला.परंतु संचालकांच्या गैरव्यवहाराने रिझर्व्ह बँकेने 22 फेब्रुवारी 2013 पासून रुपी बँकेवर निर्बंध लादल्याने अनेक खातेदारांची आयुष्यभराची पुंजी या बँकेत अडकून पडली.त्या ठेवी काढताही येत नसल्याने मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी व स्वत:च्या आजारपणासाठी देखील आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने व्याजाने पैसे घेऊन आपली कामे उरकण्याची वेळ या खातेदारांवर आली आहे.
                   कुठलीही चूक नसताना स्वत:च्या हक्काचे पैसे दिले जात नसल्याने त्रस्त झालेल्या रुपी बँकेच्या खातेदारांना आता दाद मागायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या दीड वर्षांपासून यावर राज्य शासन तोडगा काढत असून त्यावर कसलाच ठोस उपाय होताना दिसून येत नसल्याने अजून हा वनवास किती दिवस यावरच आत्मचिंतन करण्याची वेळ खातेदारांवर आली आहे.मोशी येथील बोऱ्हाडे वाडी,शिवाजी वाडी,सस्ते वाडी,लक्ष्मीनगर आदी ठिकाणच्या खातेदारांची रुपी बँकेच्या भोसरी शाखेत खाती आहेत.त्यात त्यांनी पाच लाखांपासून पन्नास लाखांपर्यंत ठेवी ठेवल्या आहेत.
                  रिझर्व बँकेने रुपीला सहा महिन्यांतून एकदा खातेदाराला एक हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्याचे आदेश दिले.असले तरी ते तटपुंजे आहे.व्याजाने घेतलेल्या पैश्याचे व्याज देखील त्याने फेडता आले नाही.आता तर बॅंकेवरील निर्बंध वाढविल्याने काहीच रक्कम निघत नाही. 
                 एकंदरीतच सर्वच व्यवहार बँकिंग करण्याकडे सरकारची वाटचाल सुरु असताना अश्या प्रकारे डबगायीला आलेल्या बँकांच्या बाबतीत अपेक्षित कार्यवाही सरकार का करत नाही.केवळ आश्वासनांची खैरात करून खातेदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रयत्न सुरु असून खातेदारांच्या भावनांची गांभीर्याने दखल घेताना कोणीच दिसत नाही.राष्ट्रीय बँकेत रुपीचे विलनीकरण करून लवकरात लवकर यावर या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी खातेदार करत आहेत. 


स्वप्ने धुळीस मिळाली…
मुलीच्या लग्नासाठी पाच वर्ष मुदतीवर मी रुपीच्या भोसरी शाखेत सात लाख रुपये गुंतविले होते.परंतु गेल्या दीड वर्षांपासून बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने.मोठ्या जोमात मुलीच लग्न करण्याच स्वप्न धुळीस मिळाल एनवेळी व्याजाने पैसे घेऊन मुलीचे लग्न करावे लागल्याचे मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेने नाव न छापण्याच्या विनंतीवर सांगितले.


(पूर्व प्रसिद्धी पुढारी - पिंपरी - २९ मार्च २०१५ )

मोशी उपबाजार समितीतील 'व्यवहार ' बंद


कोट्यावधी रुपये पाण्यात ; आडते हवालदिल
श्रीकांत बोरावके   
           मोशी येथील प्रादेशिक कृषी उत्त्पन्न उपबाजार समितीतील बाजार पूर्णपणे बंद झाला असून कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेली इमारत धूळ खात पडून आहे.संपूर्ण माल एकाच ठिकाणी मिळत नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे सांगण्यात येते.मोशी उपबाजारापासून पिंपरी व खडकीतील बाजार जवळच असल्यामुळे शेतकरी व्यापारी वर्गाला पर्यायी बाजार उपलब्ध होत आहे.बाजार समितीने गाळे खरेदी वेळेस खडकी व  पिंपरीतील ठोक विक्री बंद करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले होते.परंतु अद्यापही तेथील कामकाज सुरु आहे.परिणामी मोशी बाजारामध्ये माल भरूनही गिऱ्हाईक येत नसल्यामुळे आडते हवालदिल झाले आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून बाजार या ना त्या कारणाने बंद असल्याने पुणे बाजार समितीने तीस कोटी  रुपये खर्च करून बांधलेल्या या उपबाजार समितीचे कामकाजच सुरळीत सुरु होत नसल्याने याच्या उभारणी साठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 
        
  मोशी बाजार समितीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी गाळे खरेदी केले असून भविष्यातील उद्योजक व्यावसायाच्या दृष्ठीने याकडे पाहत आहे.त्यामुळे अनेक जणांनी गाळे खरेदी केल्या नंतर याकडे ढूकुनही पाहिले नसल्याचे चित्र आहे.तसेच समितीचे देखील बाजारकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे बाजार समितीचे व्यवहार अद्यापही सुरु झाले नाही.परिणामी शेतकरी आपला माल इतर पर्यायी ठिकाणी विक्री साठी नेत आहेत.दैनंदिन बाजार अद्यापही सुरु झाला नसल्यामुळे अनेक गरजू शेतकरी व आडते अडचणीत सापडले आहेत.
           सद्या बाजार समितीमध्ये १५९ गाळे असून फळे भाजीपाला ,कांदा,बटाटा विक्रीसाठी हे गाळे सुरु करण्यात आले.येथील सर्वच गाळ्यांची विक्री झाली असून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने तीस कोटी रुपये खर्च करून हा उपबाजार उभारला आहे.सुरुवातीच्या काळात कामकाज पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हा बाजार रखडला होता.अखेर उद्घाटनानंतर बाजार समितीमध्ये सुरुवातीच्या केवळ दहा गाळ्यांवरच कामकाज झाले.नंतर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल पुणे मार्केट यार्डातील घाऊक  बाजारात नेण्यास सुरुवात केली.



अशी आहेत कारण …

१) संपूर्ण माल एकाच ठिकाणी मिळत नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची याकडे पाठ

२) पिंपरी व खडकीतील बाजार जवळच असल्यामुळे शेतकरी व्यापारी वर्गाकडून त्याचा  पर्यायी वापर.

३) गाळे खरेदी वेळेस खडकी व  पिंपरीतील ठोक विक्री बंद करण्याचे व्यापाऱ्यांना दिलेले समितीचे आश्वासन फोल.

४) भविष्यातील व्यावसायाच्या दृष्ठीने स्थानिकांची गाळे खरेदी त्यामुळे सद्या शुकशुकाट.

५) समितीचे देखील या उपबाजाराकडे दुर्लक्ष


 (पूर्व प्रसिद्धी पुढारी -पिंपरी -२५ मार्च २०१५ )

गुरुवार, ४ जून, २०१५

अखंड स्थीतीचा निर्धारु…….'रायगड'

                        वृंदावन,मथुरा,काशी आणि रामेश्वर कोणाला
                        ज्या अभाग्याने रायगड न देखिला त्याला…….
 हिंदवी स्वराज्याचे उत्तराधिकारी छञपतींचे थोरले पुञ संभाजी राज्यांनी

राजा शिवछञपतींच्या उपरांत स्वराज्याच्या गादिचा मान स्वीकारताना केलेला रायगडाचा उल्लेख हा निश्चीतच या अफाट दरयाखोरयात ,राना-वनात निर्भीड जंगलाच्या सानिध्यात वसलेल्या किल्ले रायगडचा गौरवच म्हणावा लागेल.
             शिवछञपतींना ज्याने हिंदवी स्वराज्याचे शञिय कुलांवतस होताना पाहिले,राजमाता जिजाउचे जीवन चरिञ ज्या मातीत घडले,ज्याने मातृत्वाची अफाट जिदद् हिरकणीच्या रुपात पाहिली ,ज्याने महाराणी येसुबाईचा महापरक्रम पाहिला आणि ज्याने हिंदवी स्वराज्याची राजधानी हेण्याचा बहुमान मिळवीला  या अशा अनेक स्थितीचा अखंड पणे साशीदार असलेल्या किल्ले रायगडाची सफर आपल्याला हिंदवी स्वराज्याच्या सुर्वण काळात घेऊण जाईल यात शंका नाही.
            कोकण प्रदेशातील रायगड जिल्हयात सहयाद्री पर्वत रांगेत किल्ले रायगड वसलेला आहे .गडावर जाण्यासाठी 1400 पायरया आहेत 18 व्या शतकात इंग्रजांच्या ताब्यात गड आल्यावर इंग्रजांनी या सहयाद्रीच्या स्वर्गाची नासधुस केली.रायगडचे प्राचीन नाव 'रायरी' असे होते. या बलाढ्य किल्ल्याची सफर करायची म्हटंल्यास संपुर्ण एक दिवसाचा कालावधी पुरेसा होतो.
            चला तर घेऊ  महादेवाचे नाव आणि सुरु करु किल्ले रायगडची सहल. हा खुबलढा बुरुज याला पुर्वी चित दरवाजा असेही म्हणत आता आपल्याला दिसतोय तो उध्वस्त बुरुज.
 उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.पुढे गेल्यावर आपल्याला एक दरवाजा दिसतो या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा.या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.:
                 
चित् दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.:पुढे आपल्याला महादरवाज्या लागतो . महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत.
                 महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव.तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
              गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.: स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.: पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

  --:राजसभा :----

 महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा.आजही येथे शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जातो . राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला.हा राज्याभिषेक निश्चलपु
री गोसावी याच्या हस्ते पार पडला.
                   पुढे नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरुन आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.

 शिवाजी महाराज्यांची समाधी :---  
        हि जागा जिथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महराज्यानी चीर शांती घेतली . या बाबत एक ऎतिहसिक नोंद आढळते इंग्रज आक्रमणा नंतर रायगडावरील शिवाजी राज्यांची समाधी जनतेच्या विस्मरणात गेली होती . त्याचा पहिला शोध महात्मा ज्योतीराव फुले यांनी लावला .  मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी.
                       दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.: होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
                    बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरुन टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.
 आणि हे टोक ज्याने अफाट अश्या मातृत्वाची जाणीव रायगडला करून दिली होय  हेच ते

हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते.या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा होती .

चूकवु नहे असे काही ……. !
                  पाचाड खिंडीत रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणाऱ्याला जाणवते.

कसे जायचे …? राहण्याची सोय ? गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ ?
         पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेलो, की रायगडमाथा गाठता येतो. गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. त्यास १ मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत . राहण्याची सोय विनाशुल्क आहे पण सध्या तिथे कधी कधी ३० रु. प्रती माणूस असे घेतले जातात.गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ पायथ्यापासून चालत गेलात तर २ तास ४० मिनिटे पाळण्याने गेलात तर ५ मिनिटे. आणि हो गडावर जाण्या साठी दोन सोही आहेत एक रोप वे आणि दुसरी आपली पायवाट …

 या सुंदर आणि बलाद्य किल्ल्याची सफर आपल्याला निश्चितच अविस्मरणीय वाटावी अशीच आहे …
  
श्रीकांत बोरावके