शुक्रवार, १७ जुलै, २०१५

शहरात रोडरोमियोंचा उच्छाद वाढतोय

  वेळीच प्रतिबंध करण्याची गरज ; तरून दिशाहीन होतायेत
श्रीकांत बोरावके
                   द्योगनगरीत सद्या गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमियोंचा उच्छाद वाढत असून यांमुळे शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनीना,महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या रोडरोमीयोंची मजल मुलींचा विनयभंग करण्या पर्यंत जात असून केवळ भीती मुळे काही पालक त्यांची तक्रार करण्यास धजावत नाही.तर यांमुळे आपली शाळा,शिक्षण,नोकरी बंद होईल या भितीने मुलीही हा प्रकार पालकांना न सांगता निमूटपणे  सहन करत असल्याने या रोडरोमियोंना चांगलेच रान मोकळे झाले आहे.एका दुचाकीवर ट्रिपल शीट बसून जोरजोरात कर्कश आवाज करत हॉर्न वाजवणे यांमुळे मुलींचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणे,मुलींना भरधाव वाहन चालवत कट मारून निघून जाने,अचकट विचकट आवाज काढणे,मुलींना पाहून अश्लील हावभाव करणे असले प्रकार सद्या सुरु आहेत.पिंपरी चिंचवड शहरातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी नजीकच्या ग्रामीण भागातील व उपनगरातील मुलींचीही मोठी संख्या आहे.यावेळी ग्रामीण भागातील मुलींना बसने प्रवास करावा लागतो.बसस्थानकात वा स्थानकाकडे चालण्याच्या रस्त्यावर येताच रोड रोमियो मोठ्या संख्येने आपली हीरोगिरी दाखवत असतात.वर्गामध्ये ही काही मुले असे प्रकार करत असून त्यांना बाहेरील मुलांचाही पाठींबा मिळत असतो. त्याचबरोबर बसस्थानकापासून महाविद्यालयांपर्यंतचे बरेच अंतर असल्यामुळे या विद्यार्थिनी रस्त्यावरून पायी चालत असतांना रोडरोमियो मोटारसायकल  वरून मागून येतात व मोठ्या आवाजात गाडीचा हॉर्न वाजविने, रस्त्यावरून  वेगात असलेल्या मोटारसायकलवरून मुलींना कट मारून जाने, आदी प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत असल्याने या ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी ही रोमियोगिरीची घुसमट नाईलाजाने सहन करावी लागत आहे.
                 रोमियो गिरी करणारे तरुणही अगदी सोळा ते एकोणीस वयो गटातील असून हिरोगिरी करण्याच्या नादात आपण काहीतरी गुन्हा करतोय याची जाणीव त्यांनाही नसल्याचे दिसून येते.अशाप्रकारच्या कृत्यांवर वेळीच प्रतिबंद घातला जात नसल्याने त्यांचे धाडस वाढत असून प्रसंगी विनयभंगा सारखे गंभीर गुन्हे ही घडतांना दिसून येत आहे.अशाप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांबरोबरच महाविद्यालय आणि शिक्षकांची ही जबाबदारी असून पालकांनी ही आपल्या मुलांच्या वागणुकी कडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.दरम्यान शहरातील भोसरी,पिंपरी,मोशी,आळंदी रस्ता,दिघी,चिखली,कुदळवाडी,आकुर्डी,निगडी,मोहन नगर,इंद्रायणी नगर,चिंचवड आदी भागातील शाळा,महाविद्यालय परिसरात हे प्रकार घडत असून यावर पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.केवळ तक्रार येण्याची वाट पाहण्यापेक्षा पोलिसांनी स्वत:च लक्ष पुरवायला हवे असाही सुरु पालक वर्गातून उमटत आहे. 

मुली म्हणतात नाव नाही छापणार न…. मग सांगते …!


 १) बाबा माझे शिक्षणच थांबवतील
आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ असे चार भावंड असून आमची घरची परस्थिती ही बेताची असूनही माझे बाबा आम्हांला उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवतात काही मुलांचा त्रास हा नियमित सहन करावा लागतो.या बाबत तक्रार ही करता येत नाही.तक्रार केल्यास घरी समजेल आणि नाहक त्रास नको म्हणून बाबा माझे शिक्षणच थांबवतील अशी भीती वाटते.असे भोसरी भागातील शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
२) ''व्हाईट कॉलर'' रोमियोगिरी कशी थांबवणार

    चांगल्या वेशात सुशिक्षित पेहरावात राहून रोमियोगिरी करणारे ही भरपूर आहेत.केवळ सभ्य दिसण्यामुळे त्यांच्या कडे बोट करता येत नाही.अशांवर संशय ही घेता येत नाही तर कारवाही दूरच राहिली.बस,लोकल यांमध्ये हे रोमियो चाळे करत असतात.अगदी निर्दोकपणे
३) सिटवर आहे व्हाटस अप नंबर
बस मधून मोठ्या आवाजात 'तुजा व्हाटस अप नंबर दे फक्त ' असे बोलणारी बरीच मुल आहेत त्यांचा ग्रुपच असतो दररोज प्रवासात.त्यात  काही आमच्याच वर्गातील असतात .उतरताना पुन्हा मोठ्याने ओरडतात माझा नंबर आहे बग सीटवर … सेव कर नक्की.आणि पुन्हा नावाचा जयघोष सुरु.

4) तसला काही प्रकार कानावर येता कामा नये.
आई म्हणते आपल थेट कॉलेजला जायचं आणि घरी यायचं कोणी काही बोलल तरी लक्ष द्यायचं नाही.त्यांच्या नादी लागायचं नाही.तसल काही झालेल आमच्या कानी आले तर तुज शिक्षणच बंद.


समुपदेशन करण्याची गरज
केवळ कारवाईचा फास न आवळता असे कृत्य करणाऱ्या मुलांचे समुपदेशन करायला हवे.त्यांच्या कडून ही नकळत केवळ अज्ञानातून असे प्रकार घडत आहेत.हिरोगिरी करण्याच्या नादात आपण काही तरी गुन्हा करतोय याची त्यांनाही जाणीव नसतेच.अर्थात याची सुरुवात समाजापेक्षा घरातून होणे गरजेचे आहे.आपला मुलगा काय करतो याकडे पालकांनी दुर्लक्ष करणे योग्य नव्हे.अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षिका राधामाई कुलकर्णी यांनी व्यक्त केली.  
( पूर्व प्रसिद्धी -पुढारी -पिंपरी - ०४ जुलै २०१५ )

 

उद्योगनगरीत स्थानिकांची वणवण


पात्रता असूनही बेरोजगार राहण्याची वेळ ; आश्वासने फोल

 श्रीकांत बोरावके
                  आपली शेतजमीन उद्योगनगरीच्या विकासाला देऊन अल्पभूधारक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यानच्या मुलांवरच आज बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे.स्थानिक म्हणून सर्व पात्रता पूर्ण करूनही नोकरी पासून डावलल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.नोकरी देणे हा ज्या त्या कंपनीच्या व्यवस्थापनाचा अधिकार असल्याने डावलले घेल्यास तक्रार ही दाखल करता येत नसल्याने यावर राजकीय वरदहस्ताशिवाय दुसरा उपाय ही सापडत नाही.ज्या तरुणांना असा वरदहस्त लाभत नाही त्यांना मात्र बेरोजगारीच्या दलदलीतून बाहेर पडणे अशक्य होत आहे.
               उद्योगनगरीतील अशा बेरोजगारांची संख्या हजारोंच्या वर असून दरवर्षी त्यात भरच पडत आहेत.स्थानिकांना नोकऱ्या मध्ये सामावून घेण्या करिता त्यांना आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्या करिता शासनाने परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारल्या आहेत.येथील स्थानिक मुले ही येथून प्रशिक्षण पूर्ण करत असतात तदनंतर त्यांना सहा महिन्यांच्या अनुभव प्रशिक्षणास सरकारी,निमसरकारी वा काही बड्या कंपन्यांमध्ये रुजू करण्यात येते मात्र हा सहा महिन्यांचा प्रशिक्षण काळ संपल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने कायम स्वरूपी रोजगार मिळविण्याचा शोध सुरु होतो.तेव्हा त्यांना स्थानिक म्हणून नोकरी नाही या वास्तवाला सामोरे जावे लागते.त्यांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आज पर्यंत अनेक पक्ष व नेत्यांनी आपआपल्या कार्यक्रमात आश्वासने दिली.पण प्रत्येक तरुणाला आज ही आश्वासने फोल ठरल्याचे वाटत आहे. आहे.यामुळे असे बेरोजगार तरुण व्यसनांच्या आहारी जात असून हे व्यसन करण्यासाठी लागणारे पैसे मिळविण्यासाठी ते झटपट पैसे मिळवून देणारे उद्योग शोधू लागतात.यातूनच गुन्हेगारी ही वाढताना दिसून येते.यासर्व गोष्टींचा परिणाम त्याला एकट्यालाच सहन करावे लागत नसून त्याच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही सहन करावे लागत आहेत.
           याबाबत कंपन्यांचे म्हणणे ही विचारात घ्यायला हवे त्यांच्या म्हणण्या नुसार स्थानिक तरुण कंपनीत दंडेलशाही करतात.प्रसंगी वरिष्ठांना मारहाण ही करतात यामुळे स्थानिक तरुणांना कंपनीची दारे बंद केली जात असल्याचे समोर येत आहे.परंतु काही मुठभर व्यक्तींच्या दंडेलशाही प्रवृत्तीत सर्वच स्थानिक तरुणांचे मोजमाफ करणे कितपत योग्य एका मुळे सर्वांवरच अन्याय का ? असा प्रश्न काही होतकरू स्थानिक तरुण उपस्थित करत आहेत.या जटील प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा भविष्यात हा विषय पेटल्या शिवाय राहणार नाही असा सूर ही स्थानिक समाजिक कार्य करणाऱ्या संस्थामधून निघत आहे.
दंडेलशाहीवरचा उपाय

या प्रश्नाबाबत एका खाजगी बड्या कंपनीच्या अधिकाऱ्यास विचारले असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि स्थानिक मुले बदलून दिलेल्या शीप मध्ये काम करू इच्छित नसतात.त्यात बाहेरील राज्यातील,जिल्ह्यातील मुले सुपरवाईजर,वरिष्ठ अधिकारी म्हणून नेमल्यास त्यांचा हुकुम ऐकणे त्यांच्या हाताखाली काम करणे याचा येथील मुलांना न्यूनगंड वाटतो.त्यात कामावरून तणाव,वाद निर्माण झाल्यास थेट स्थानिक म्हणून दंडेलशाही दाखवून वरिष्ठांना मारहाण ही करतात.यावर उपाय म्हणूनच स्थानिकांना न घेण्याचा पायंडाच कंपनीत पाडला जातो.

एका मुळे सर्वांनाच त्रास का ?
दंडेलशाही करणारा कोणी एक असतो परंतु त्याच्या वरील कारवाई मध्ये इतर स्थानिक तरुणही भरडले जातात.यामुळे सर्वांनाच नोकरीची दारे बंद करणे कितपत योग्य ? यावर एक सकारात्मक उपाय हवाच अन्यथा बेरोजगारीचा वाढता लोंढा कोणता सुसंस्कृत समाज निर्माण करेल याचा एक जागृत तरुण म्हणून आम्हांला ही प्रश्न पडतो.
                                       :- सचिन पाटोळे,एका खाजगी सामाजिक संस्थेचे संचालक.
या भागात आहेत अघोषित निर्बंध

उद्योगनगरीतील भोसरी एमआयडीसी,तळवडे,निगडी,पिंपरी चिंचवड,हिंजवडी परिसर या परिसरात व उद्योगनगरी नजीक चाकण,महाळुंगे,निघोजे,आळंदी फाटा आदी ठिकाणी असलेल्या बड्या कंपन्यांमधून स्थानिकांना पात्रता असूनही डावलले जाते.  

 ( पूर्व प्रसिद्धी पुढारी - पिंपरी - ०२ जुलै २०१५ )



सोमवार, ६ जुलै, २०१५

आनंद मिळविता आला पाहिजे…!

                      
  काल-परवा गावाकडे सहज जाणे झाले.गावातील भैरवनाथ मंदिराचा कळस पावसाच्या सरी झेलत होता.महानगरांपासून जवळ असूनही गावाने आपले गावपण शाबूत ठेवले होते.रविवारचा तो दिवस होता मी पुण्यावरून पावसात चिंब भिजत प्रवास करून घरी आलो होतो.सायंकाळचे सहा वाजले होते.बाहेर पडणारा मुसळदार पाऊस पाहत मी दारात उभा होतो.तेवड्यात ''कव्हा आलासा …जी असे म्हणत सखूमावशी माझ्या पुढे उभी राहिली.सखू मावशी शिक्षणाचा मागमूस नसलेली,देशाच्या पस्तीस रुपयात जेवण मिळवणाऱ्या लोकांच्या यादीतही न बसू शकणारी,आपला पती हेच आपलं दैवत आणि आपल्या मुलांचे योग्य संगोपन हेच जीवनकार्य मानणारी पुरोगामी महाराष्ट्रातील हि महिला होती.ती माझी कोणीही नव्हती तरीही माणुसकीच्या बंधनात ती आमची कोणातरी असल्याची जाणीव आम्हाला होती.
''दुपारीच आलो मावशी ; कशा आहात तुम्ही…. ? ''  मी विचारल.  ''बरी आहे जी आमच्या ठकूचा बडडे आहेजी ताईसाहेबांना बोलवायला आले होते.तुम्ही पण भेटलात बर झाल.ताईनां पण सांगा आणि तुम्ही पण या चला अजून निरोप द्यायचाय येते जी….''   सखू . बडडे म्हणजे बर्थ डे अस म्हणायचं होत तिला पण बर्थ डे म्हंटल्यावर कशाशी खातात जी असा वर प्रश्न तिने मला केला असता.म्हणून मी पुढे तिला काही हि न बोलता फक्त मान डोलावून होकार दिला.
                       संद्याकाळी ताई सोबत मी त्यांच्या घरी निघालो घर कसले झोपडीच ती काड्या-कुडांच्या झापाणे उभारलेला निवरा. दहा बाय दहाच्या त्या घर वजा झोपडीत मी शिरलो आणि काय आश्चर्य एका  पणतीच्या रम्य प्रकाशात लख लखनारी ती झोपडी एका वेगळ्याच दृशाची जाणीव करून देत होती.आसपासच्या लहान थोर व्यक्तींच्या सावल्या जमू लागल्या होत्या.सखू मावशीच्या नवऱ्याने कोंबड्या झाकायचा झाफ उलटा करून त्या वर फाटक धोतर टाकल होत आणि त्यावर रव्याचा गोलाकार केलेला केक ठेवला होता.दुसरी पणती त्या समोर ठेवली होती.एक एक करून सुवासिनी बोचक्या वर बसवलेल्या ठकूला ओवाळत होत्या.सखू आणि तिचा नवरा गंगाधर आलेल्या प्रत्येकाची विचारपूस आदर करीत होता.त्यांना आज गगन ठेंगणे वाटत होते.आपल्या पोरीचा बड डे म्हणजे काय कि ते असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून पाहताना मला हि एक वेगळ्या जगात आल्याचा भास होत होता.रव्यापासून बनवलेला केक पणती फुकून ठकुने कापला आणि ''हप्पी बड डे ठकू हप्पी बड डे तू यु'' असा नवीनच शुभेच्छा संदेश माझ्या कानावर पडला.रव्याचा तो घास खातांना सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद  कदाचित बेकरीतून आणलेला केक खाताना मला कधीच झाला नव्हता. सगळ्यांना रवा केक देत त्यांचा निरोप घेतांना दिसणारी सखू आणि गंगाधर मला मोठ्या पार्ट्यांमध्ये बुफे साठी आग्रह करणाऱ्या पती पत्नीन मध्ये कधीच दिसली नाहीत.वर वरचा पावूनचार करणारी,आपल्या संपत्तीच प्रदर्शन करणारीच माणंस मला दिसली होती.आज जे पाहत होतो.जे अनुभवत होतो. ते कल्पना शक्तीच्या पलीकडचे होते.आनंद मिळवता येतो फक्त त्या साठी पैसा लागत नसून सुंदर मन लागते हेच सखूच कुटुंब मला शिकवून गेल होत.खरच आनंद पैसा,संपत्ती यात नसून तो आपण कसा मिळवतो यातच आहे.फक्त त्या साठी आपल मन जाग्यावर असायला हव हे सखू कडे पाहून वाटत होत.पैसे नाहीत म्हणून मुलांना कुठेच न नेणारी माणंस,जेवणाचा,कार्यालयाचा,कपड्यांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलांचा वाढदिवस न  करणारी माणंस पहिली कि अस वाटत कि जे नाही त्याची चिंता करण्यापेक्षा जे आहे.  त्यात आनंद मिळवून सुखी राहण यांना का नाही जमत.आहे त्यात सुख मिळवन अधिक सोप्प असत फक्त ते मिळवता आल पाहिजे.हा विचार करत मी घरी आलो तर टेलिव्हिजनवर नवीन आयफोन लॉंच झाल्याची जाहिरात सुरु होती.…
( पूर्व प्रसिद्धी दैनिक प्रभात ,२० जुलै २०१४ )