बुधवार, १७ जून, २०१५

भाडेकरुंची माहिती देण्याकडे दुर्लक्ष


जागृकतेचा अभाव : निम्यापेक्षा अधिक लोकांच्या नोंदीच नाही.

श्रीकांत बोरावके
          पिंपरी - चिंचवड  शहरात बाहेरगावावरुन नोकरी तसेच शिक्षणासाठी अनेक जण राहण्यासाठी येत असतात. त्यामुळे घर भाड्याने देण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात शहरात व उपनगरात आहे. घरमालकाने घर भाड्याने देताना भाडेकरूची नोंद पोलिस स्टेशनला द्यावी असे आदेश मध्यंतरी पोलीस अधिक्षकांनी दिले होते.त्यांनंतर भाडेकरुची माहीती न देणा-या काही घरमालकावर गुन्हेही दाखल करण्यात आले.मात्र माहीती देणे बंधनकारक असतानाही घरमालकांचे या नोंदणीकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शहर व मोशी,डूडूळगाव या उपनगरांमध्ये रहायला येणा-या नागरीकांची संख्याही वाढत आहे.अनेक जण परराज्यातुन शहरात व्यापार व व्यावसायसाठी येत आहेत. शहरात आल्यानंतर भाड्याने घर घेऊन राहणा-यांचे प्रमाण यामुळेच वाढलेले आहे. त्यामुळे अनेक जण घर भाड्याने घेवुन रहात आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी व सुरक्षेच्या दृष्टिने मध्यंतरी पोलीस अधिक्षकांनी घर भाड्याने दिलेल्या व्यक्तीची संपुर्ण माहीती शहर पोलीस ठाण्याला दयावी असे आदेश काढले होते. त्यामुळे घर भाड्याने दिलेल्या प्रत्येक घरमालकाला आपल्या भाडेकरुची माहीती देणे बंधनकारक झाले आहे.या बाबत नोंद करणे अतिशय सुलभ व्हावे या साठी संकेतस्थळाचा पर्यायही पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिला असला तरीही त्या बाबत स्थानिकांमध्ये निरक्षरता असल्याचे दिसून येते.परिणामी तो हि पर्याय निरर्थक ठरत असून भाडेकरुंच्या नोंदीच या परिसरात अपेक्षेप्रमाणे होताना दिसून येत नाहीत.मोशीत स्थानिक नागरिकांच्या हजारो खोल्या भाड्याने देण्यात आल्या आहेत. बोऱ्हाडे वाडी,बनकरवस्ती,शिवाजीवाडी,आल्हाट वस्ती,सस्तेवाडी,लक्ष्मी नगर, संजय गांधी नगर,देहू रस्ता आणि मोशी गावठाण या भागात मोठ्या प्रमाणावर भाडेतत्वावर खोल्या देण्यात आल्या आहेत. सतत बदलणाऱ्या भाडेकरुंमुळे घरमालकांमध्ये त्यांची माहिती घेण्याबाबत निष्काळजीपणा असल्याचे दिसून येते. पुणे,पिंपरी शहरात हि मोहीम प्रभावी पणे राबवली जात असताना मोशी,डूडूळगावकरांमध्ये मात्र याबाबत निरुत्साह दिसून येत आहे.याबाबत पोलिस चौकीशी संपर्क साधला असता संकेत स्थळाचा पर्याय उपलब्ध करण्यात आल्याने नोंदींचा निश्चित आकडा स्थानिक पोलिस स्टेशन कडे  उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती मदत पोलिस चौकीकडून केली जाईल असे आवाहन हि त्यांनी केले आहे.
अपेक्षे प्रमाणे नोंदी नाही…

पोलिस प्रशासनाकडून संकेत स्थळाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी याबाबत मोशी व परिसरातील नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसून.एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने झालेल्या नोंदी या कमी प्रमाणात असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पुढारीला दिली आहे.


( पूर्व प्रसिद्धी  लोकमत -ग्रामीण  २२-०४-२०१५ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा