मंगळवार, १६ जून, २०१५

मोशी उपबाजार समितीतील 'व्यवहार ' बंद


कोट्यावधी रुपये पाण्यात ; आडते हवालदिल
श्रीकांत बोरावके   
           मोशी येथील प्रादेशिक कृषी उत्त्पन्न उपबाजार समितीतील बाजार पूर्णपणे बंद झाला असून कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेली इमारत धूळ खात पडून आहे.संपूर्ण माल एकाच ठिकाणी मिळत नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे सांगण्यात येते.मोशी उपबाजारापासून पिंपरी व खडकीतील बाजार जवळच असल्यामुळे शेतकरी व्यापारी वर्गाला पर्यायी बाजार उपलब्ध होत आहे.बाजार समितीने गाळे खरेदी वेळेस खडकी व  पिंपरीतील ठोक विक्री बंद करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले होते.परंतु अद्यापही तेथील कामकाज सुरु आहे.परिणामी मोशी बाजारामध्ये माल भरूनही गिऱ्हाईक येत नसल्यामुळे आडते हवालदिल झाले आहेत.गेल्या कित्येक वर्षांपासून बाजार या ना त्या कारणाने बंद असल्याने पुणे बाजार समितीने तीस कोटी  रुपये खर्च करून बांधलेल्या या उपबाजार समितीचे कामकाजच सुरळीत सुरु होत नसल्याने याच्या उभारणी साठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 
        
  मोशी बाजार समितीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी गाळे खरेदी केले असून भविष्यातील उद्योजक व्यावसायाच्या दृष्ठीने याकडे पाहत आहे.त्यामुळे अनेक जणांनी गाळे खरेदी केल्या नंतर याकडे ढूकुनही पाहिले नसल्याचे चित्र आहे.तसेच समितीचे देखील बाजारकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे बाजार समितीचे व्यवहार अद्यापही सुरु झाले नाही.परिणामी शेतकरी आपला माल इतर पर्यायी ठिकाणी विक्री साठी नेत आहेत.दैनंदिन बाजार अद्यापही सुरु झाला नसल्यामुळे अनेक गरजू शेतकरी व आडते अडचणीत सापडले आहेत.
           सद्या बाजार समितीमध्ये १५९ गाळे असून फळे भाजीपाला ,कांदा,बटाटा विक्रीसाठी हे गाळे सुरु करण्यात आले.येथील सर्वच गाळ्यांची विक्री झाली असून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने तीस कोटी रुपये खर्च करून हा उपबाजार उभारला आहे.सुरुवातीच्या काळात कामकाज पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हा बाजार रखडला होता.अखेर उद्घाटनानंतर बाजार समितीमध्ये सुरुवातीच्या केवळ दहा गाळ्यांवरच कामकाज झाले.नंतर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल पुणे मार्केट यार्डातील घाऊक  बाजारात नेण्यास सुरुवात केली.



अशी आहेत कारण …

१) संपूर्ण माल एकाच ठिकाणी मिळत नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची याकडे पाठ

२) पिंपरी व खडकीतील बाजार जवळच असल्यामुळे शेतकरी व्यापारी वर्गाकडून त्याचा  पर्यायी वापर.

३) गाळे खरेदी वेळेस खडकी व  पिंपरीतील ठोक विक्री बंद करण्याचे व्यापाऱ्यांना दिलेले समितीचे आश्वासन फोल.

४) भविष्यातील व्यावसायाच्या दृष्ठीने स्थानिकांची गाळे खरेदी त्यामुळे सद्या शुकशुकाट.

५) समितीचे देखील या उपबाजाराकडे दुर्लक्ष


 (पूर्व प्रसिद्धी पुढारी -पिंपरी -२५ मार्च २०१५ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा