काल-परवा गावाकडे सहज जाणे झाले.गावातील भैरवनाथ मंदिराचा कळस पावसाच्या सरी झेलत होता.महानगरांपासून जवळ असूनही गावाने आपले गावपण शाबूत ठेवले होते.रविवारचा तो दिवस होता मी पुण्यावरून पावसात चिंब भिजत प्रवास करून घरी आलो होतो.सायंकाळचे सहा वाजले होते.बाहेर पडणारा मुसळदार पाऊस पाहत मी दारात उभा होतो.तेवड्यात ''कव्हा आलासा …जी असे म्हणत सखूमावशी माझ्या पुढे उभी राहिली.सखू मावशी शिक्षणाचा मागमूस नसलेली,देशाच्या पस्तीस रुपयात जेवण मिळवणाऱ्या लोकांच्या यादीतही न बसू शकणारी,आपला पती हेच आपलं दैवत आणि आपल्या मुलांचे योग्य संगोपन हेच जीवनकार्य मानणारी पुरोगामी महाराष्ट्रातील हि महिला होती.ती माझी कोणीही नव्हती तरीही माणुसकीच्या बंधनात ती आमची कोणातरी असल्याची जाणीव आम्हाला होती.
''दुपारीच आलो मावशी ; कशा आहात तुम्ही…. ? '' मी विचारल. ''बरी आहे
जी आमच्या ठकूचा बडडे आहेजी ताईसाहेबांना बोलवायला आले होते.तुम्ही पण
भेटलात बर झाल.ताईनां पण सांगा आणि तुम्ही पण या चला अजून निरोप द्यायचाय
येते जी….'' सखू . बडडे म्हणजे बर्थ डे अस म्हणायचं होत तिला पण बर्थ डे
म्हंटल्यावर कशाशी खातात जी असा वर प्रश्न तिने मला केला असता.म्हणून मी
पुढे तिला काही हि न बोलता फक्त मान डोलावून होकार दिला.
संद्याकाळी ताई सोबत मी त्यांच्या घरी निघालो घर कसले झोपडीच ती
काड्या-कुडांच्या झापाणे उभारलेला निवरा. दहा बाय दहाच्या त्या घर वजा
झोपडीत मी शिरलो आणि काय आश्चर्य एका पणतीच्या रम्य प्रकाशात लख लखनारी ती
झोपडी एका वेगळ्याच दृशाची जाणीव करून देत होती.आसपासच्या लहान थोर
व्यक्तींच्या सावल्या जमू लागल्या होत्या.सखू मावशीच्या नवऱ्याने कोंबड्या
झाकायचा झाफ उलटा करून त्या वर फाटक धोतर टाकल होत आणि त्यावर रव्याचा
गोलाकार केलेला केक ठेवला होता.दुसरी पणती त्या समोर ठेवली होती.एक एक करून
सुवासिनी बोचक्या वर बसवलेल्या ठकूला ओवाळत होत्या.सखू आणि तिचा नवरा
गंगाधर आलेल्या प्रत्येकाची विचारपूस आदर करीत होता.त्यांना आज गगन ठेंगणे
वाटत होते.आपल्या पोरीचा बड डे म्हणजे काय कि ते असल्याचा आनंद
त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून पाहताना मला हि एक वेगळ्या जगात आल्याचा भास
होत होता.रव्यापासून बनवलेला केक पणती फुकून ठकुने कापला आणि ''हप्पी बड डे
ठकू हप्पी बड डे तू यु'' असा नवीनच शुभेच्छा संदेश माझ्या कानावर
पडला.रव्याचा तो घास खातांना सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद कदाचित
बेकरीतून आणलेला केक खाताना मला कधीच झाला नव्हता. सगळ्यांना रवा केक देत
त्यांचा निरोप घेतांना दिसणारी सखू आणि गंगाधर मला मोठ्या पार्ट्यांमध्ये
बुफे साठी आग्रह करणाऱ्या पती पत्नीन मध्ये कधीच दिसली नाहीत.वर वरचा
पावूनचार करणारी,आपल्या संपत्तीच प्रदर्शन करणारीच माणंस मला दिसली होती.आज
जे पाहत होतो.जे अनुभवत होतो. ते कल्पना शक्तीच्या पलीकडचे होते.आनंद मिळवता येतो फक्त त्या साठी पैसा लागत नसून सुंदर मन लागते हेच सखूच कुटुंब मला शिकवून गेल होत.खरच आनंद
पैसा,संपत्ती यात नसून तो आपण कसा मिळवतो यातच आहे.फक्त त्या साठी आपल मन
जाग्यावर असायला हव हे सखू कडे पाहून वाटत होत.पैसे नाहीत म्हणून मुलांना
कुठेच न नेणारी माणंस,जेवणाचा,कार्यालयाचा,कपड् यांचा खर्च परवडत नाही
म्हणून मुलांचा वाढदिवस न करणारी माणंस पहिली कि अस वाटत कि जे नाही
त्याची चिंता करण्यापेक्षा जे आहे. त्यात आनंद
मिळवून सुखी राहण यांना का नाही जमत.आहे त्यात सुख मिळवन अधिक सोप्प असत
फक्त ते मिळवता आल पाहिजे.हा विचार करत मी घरी आलो तर टेलिव्हिजनवर नवीन
आयफोन लॉंच झाल्याची जाहिरात सुरु होती.…
( पूर्व प्रसिद्धी दैनिक प्रभात ,२० जुलै २०१४ )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा