मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

तरुणाईला व्हाइटनरची झिंग

शाळकरी मुलांमध्ये प्रमाण अधिक ; पालक अज्ञभिज्ञ 

श्रीकांत बोरावके : मोशी

      
     
                 कागदावरील एखादी चूक झाकण्यासाठी वापरले जाणारे व्हाइटनरच आज चुका करण्याचे साधन बनत असून किरकोळ वाटणारे व्हाइटनर आज नशा करण्याचे साधन बनत आहे.या नव्या अमली पदार्थ ठरू पाहणाऱ्या व्हाइटनरने नशा करू पाहणाऱ्या  मुलांचे प्रमाण गेल्या चार पाच वर्षांपासून वाढत आहे. तेरा वर्षांपर्यंतची मुले या सेवनाला जास्त बळी पडत असल्याचे समोर आले असून याबाबत मुलाबरोबरच पालकही अज्ञभिज्ञअसल्याचे दिसून येते.केवळ काहीतरी वेगळे जाणवते म्हणून दररोज व्हाइटनरचा वास घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपण कुठल्याश्या व्यसनाच्या आहारी जात आहोत हे जाणवत नाही तर आपला मुलगा असले काही करत असले याची पालकांना ही जाणीव नाही.
रस्त्यावरील,झोपडपट्टीतील,रेल्वेस्टेशन वरील मुलांपूर्ती व्हाइटनरची नशा सीमित राहिली नसून पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यमवर्गीयांपासून ते उच्चभ्रू कुटुंबातील मुलांमध्येही हा प्रकार सुरु आहे.शाळेत वा शाळेबाहेर ,स्कूलबस मध्ये पालक नसताना घरात किंवा सोसायटी,वस्ती मध्ये आज चोरी छुपे मुले व्हाइटनरची नशा करताना दिसून येतात.मध्यंतरी व्हाइटनरच्या विक्री वर प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध घातले होते.यामध्ये प्रामुख्याने विक्री करताना ग्राहकाची मागणी,ग्राहकाचे वय,एकाच ग्राहकाची वारंवार त्याच गोष्टीची मागणी होऊ लागल्यास त्या ग्राहकास विक्री न करने अशा निर्बंधांचा समावेश होता.परंतु केवळ व्यवसाय वृद्धीसाठी अशा निर्बंधांचा विचार न करता सरासपणे मागणी तसा व्हाइटनरचा पूरवठा होताना दिसून येतो.यामुळेच या व्यसनाला पायबंद घालणे अशक्य होताना दिसून येते.कमी किंमतीत आणि सहज उपलब्ध होत असल्याने काही इतर साधनातून व्यसन करणारी मंडळी ही व्हाइटनरच्या व्यसनाकडे वळतात.प्रामुख्याने व्हाइट स्टेशनरीच्या दुकानात मिळत असल्याने आणि स्टेशनरीची दुकाने शाळा,महाविद्यालय परिसरात असल्याने या मंडळीची अशा ठिकाणी वर्दळ असते त्यात अशा लोकांच्या संपर्कात एकदा शाळकरी मुलगा आल्यास त्यालाही यात गुंतण्यात वेळ लागत नाही आणि अशा प्रकारे एका कडून दुसऱ्याला दुसऱ्या कडून तिसऱ्याला व्यसनाची माहिती प्रसारित होते.आणि यातूनच व्यसन वाढते.शहरातील भोसरी,पिंपरी,मोशी,आळंदी रस्ता,दिघी,चिखली,कुदळवाडी,आकुर्डी,निगडी,मोहन नगर,इंद्रायणी नगर,चिंचवड आदी भागातील शाळा,महाविद्यालय परिसरात हे प्रकार घडत आहेत.


असे होते व्हाइटनरची नशा….

व्हाइटनर रुमालावर टाकून हुंगल्याने त्याची नशा चढते. व्हाइटनरमध्ये अॅसिटोन असल्याने त्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो. यामुळे कमालीची नशा चढते आणि बधिरताही येते. अॅसिटोन हळूहळू स्नायूंवर परिणाम करून, ते दुबळे करतात. मानसिकदृष्ट्या मुले खच्ची होऊ लागतात आणि काही वेळेस मुलांमध्ये आक्रमकताही तेजीने वाढते, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात..


               आपला मुलगा व्हाइटनरच्या सेवनाला बळी पडतो आहे हे पालकांच्या सहज लक्षात येत नाही. रस्त्यावर, रेल्वेस्टेशनवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांचे प्रमाण या सेवनामध्ये जास्त दिसून येते. व्हाइटनर कमी किमतीत आणि सगळीकडे सहज उपलब्ध असल्याने मुले त्याचा वापर करू शकतात. या अमली पदार्थासंदर्भात पालकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये फारशी माहितीही नाही. त्यामुळे मुलाने त्याची मागणी केली अथवा दुकानातून जाऊन आणले तर, शालेय कामासाठी त्याचा वापर करत असेल या विचाराने पालकांचे या वृत्तीकडे दुर्लक्ष होते.
                                                     
( पूर्व प्रसिद्धी,पुढारी २० जुलै २०१५ )


                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा